पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू आहे. यामध्ये करोनाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षणावर भर दिला जात आहे. मागील नऊ दिवसांत ग्रामीण भाग व नगरपालिका हद्दीतील एकूण 4 लाख 75 हजार 944 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 हजार 767 संशयित रुग्ण आढळून आले. यातील 4 हजार 602 नागरिकांची फ्लू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली. यापैकी 674 नागरिक करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 106 झोनल व 1 हजार 977 सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 1 हजार 977 तर नगरपालिका क्षेत्रासाठी 1 हजार 203 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दि.8 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2020 या दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रात 3 लाख 51 हजार 513 तर नगरपालिका क्षेत्रात 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी 4 हजार 767 संशयित रुग्ण असून 4 हजार 602 नागरिकांची फ्लू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 674 नागरिक करोनाबाधित तर 3 हजार 801 नागरिक निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्यांपैकी 577 रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. 106 रुग्ण गृह अलगिकरणामध्ये आहेत. निगेटिव्ह असणाऱ्यांपैकी 2 हजार 542 नागरिक गृह अलगीकरणामध्ये असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील इंदापूर, जुन्नर, मावळ, शिरुर व बारामती या नगरपालिकांसाठी 47 झोनल व 1 हजार 203 सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील नऊ दिवसांत नगरपालिका हद्दीतील एकूण 1 लाख 24 हजार 431 नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकूण तपासणी झालेल्या नागरिकांपैकी 973 संशयित रुग्ण असून यापैकी 931 नागरिकांची फ्लू क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 149 नागरिक बाधित तर 782 नागरिक निगेटिव्ह आहेत.
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्याने या मोहिमेच्या माध्यमातून करोनाचे अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार केले जाणार आहेत. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
– डॉ. राजेश देशमुख,जिल्हाधिकारी, पुणे