पाबळ -करोना संसर्गापासून प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करणे हीच प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपचारासाठी कोविड सेंटरची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी दिली. पालकमंत्री अजित पवार व कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, येत्या आठ दिवसांत अनुषंगिक बाबींची पूर्तता करून हे रुग्णालय नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल.
पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील 39 गावांतील नागरिकांनी शासनाने निर्देश दिलेल्या सूचनांचे पालन करीत असतानाही, पाच महिन्यांनी चोर पावलाने का होईना करोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी आता कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय जवळ असणे ही बाब अधोरेखित झाली होती.
यासाठी या भागात अद्ययावत कोविड सेंटरची उभारणी व्हावी यासाठी दैनिक प्रभातचे माध्यमातून 13 सप्टेंबरच्या अंकात ही बाब अधोरेखित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार अशोक पवार यांनी तातडीने हालचाल करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वळसे पाटील यांची दूरदृष्टी
दिलीप वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून 2014 मध्ये पाबळ येथे अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त ग्रामीण रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली; मात्र शासन बदलल्याने निधीअभावी काही काळ व्यतीत झाला. तरी वळसे पाटील यांनी नेटाने निधी उपलब्ध करून दिल्याने अत्यंत दिमाखदार रुग्णालय पूर्णत्वास गेले. त्याचवेळी करोनाचा प्रश्न उभा राहिला. आता या रुग्णालयाची उपयुक्तता सिद्ध झाल्याने या भागातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
ऑक्सिजन बेड उपलब्ध
30 बेड, 10 राखीव बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, 4 बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, एक्स रे सुविधा, 10 निवासी डॉक्टरसाठी निवास व्यवस्था, कर्मचारी निवास या सर्व उच्च दर्जाच्या सुविधा, तसेच नैसर्गिक सुशोभित आवार यासह विद्युत व जनरेटर व्यवस्था सहा एकर परिसरात करण्यात आली आहे.