पुणे – महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी घेतला. आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्ता, एकलव्य कॉलेज ते मुंबई-पुणे रस्ता, बालभारती ते पौड फाटा रस्ता, पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्ता या प्रकल्पांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. जनतेच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांना गती द्यावी, कोठे भूसंपादनाचे अडथळे असतील तर सहमतीने मार्ग काढण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना पाटील यांनी यावेळी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, उपवसंरक्षक राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते. बैठकीत भिडे वाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक करणे, पीएमसी व स्वच्छ संस्थेचे मॉडेल व घनकचरा व्यवस्थापन, कोथरूड येथील गदिमा स्मारकाचे काम आदींबाबतही आढावा घेण्यात आला.
एकलव्य कॉलेज ते पुणे-मुंबई महामार्गाचा सेवा रस्ता 15 मीटर रुंदीचा आहे. या रस्त्याची लांबी शांतिबन चौक ते एकलव्य कॉलेज दरम्यान 250 मीटर व एकलव्य कॉलेज ते पुणे-मुंबई सेवा रस्त्यापर्यंत 360 मीटर अशी एकूण 610 मीटर आहे. या लांबीपैकी एकूण विकसित झालेल्या रस्त्याची लांबी सुमारे 540 एवढी आहे. विकसन न झालेल्या रस्त्याची बाधित मिळकत भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता विकसित झाल्याने चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
कोथरुड-कर्वेनगरचे अंतर होणर कमी
डॉ. आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याअंतर्गत विकास योजनेच्या मान्य विकास आराखड्यानुसार आंबेडकर चौक ते गोपीनाथनगर, कोथरूडपर्यंत 30 मीटर डी. पी. रस्त्याची लांबी सुमारे 1 हजार 800 मीटर आहे. या रस्त्यात सद्यःस्थितीमध्ये डोंगर उतार व मोठ्या प्रमाणात पातळी कमी जास्त आहे. त्यामुळे नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोथरुड व कर्वेनगर भागातील प्रवासाचे अंतर कमी होऊन कर्वे रस्त्यावरील (एनडीए रस्ता) वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.