पुणे -शहराचा महत्त्वकांक्षी प्रकल्प पुणे मेट्रोच्या विस्तारास “पंतप्रधान गतिशक्ती’ योजनेंतर्गत “नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप’ने मंजुरी दिला आहे. त्यामुळे स्वारगेटपासून कात्रजपर्यंत आणि पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय, पुण्याहून बंगळुरू आणि पुणे-औरंगाबाद या दोन नव्या “एक्स्प्रेस-वे’ला मंजुरी मिळाली आहे.
“नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप’ची महत्त्वाची बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली. याच बैठकीत मंजुरी मिळालेल्या पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्ग (49 हजार कोटी रुपये) पुणे-औरंगाबाद महामार्गासाठी (12 हजार कोटी रुपये) मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पब्लिक इन्व्हेस्टमेंड बोर्ड) आणि केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी गरजेची आहे.
मंत्रीमंडळ निर्णयाची प्रतीक्षा
पुणे मेट्रोच्या विस्तारास “नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप’ने मंजुरी दिली असली, तरी या प्रकल्पांसाठी आता केंद्रीय मंत्रीमंडळाच्या होकाराची औपचारिकता राहिली आहे. अर्थात, त्यासाठी केंद्रीय स्तरावर अन्य काही मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतरच हा प्रकल्प अहवाला निर्णयासाठी येणार आहे.
मेट्रोचा विस्तारित मार्ग
1. स्वारगेट-कात्रज : मार्केट यार्ड – पद्मावती – कात्रज
2. पिंपरी – निगडी : चिंचवड -आकुर्डी – निगडी
असे असतील नवे महामार्ग
1. पुणे- बंगळुरू : सुमारे 12 जिल्ह्यांतून हा द्रुतगती मार्ग प्रस्तावित आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, तर कर्नाटकात बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमाकुरू, बंगळुरू हे जिल्हे जोडले जातील. 8 लेन असणाऱ्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 49 हजार कोटी रुपये असून, 700 कि.मी. अंतर 6 तासांत पूर्ण कापण्याचे उद्दिष्ट. वाहनाचा वेग ताशी सरासरी 120 कि.मी. असेल.
2. पुणे- औरंगाबाद : पुुणे, नगर आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यांतून हा महामार्ग प्रस्तावित आहे. यात पुण्यातील भोर, पुरंदर, हवेली, दौंड आणि शिरूर तालुके जोडले जातील. तर, औरंगाबादेतील औरंगाबाद आणि पैठण हे दोन तालुके जोडले जातील. 6 लेन असणाऱ्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 12 हजार कोटी रुपये असून, 225 कि.मी. अंतर 2 तासांत पूर्ण कापण्याचे उद्दिष्ट. वाहनाचा वेग ताशी सरासरी 120 कि.मी. असेल.