पुणे -राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने काही आक्षेप घेत हा प्रकल्प थांबविला होता. त्यामुळे हा प्रकल्प होणार की नाही, अशी चर्चा असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी
दिल्ली येथे बैठक झाली. यामध्ये रेल्वेमंत्र्यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या प्रकल्पाबाबत रेल्वे विभाग या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करतील. त्यासाठी एक पथक नेमण्यात येणार आहे. तांत्रिक तपासणी अहवालानंतर हा प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीत या मंजुरी मिळेल, अशा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ही रेल्वे पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. यासाठी सुमारे 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल कॉर्पोरेशनच्या वतीने हात घेण्यात आला आहे. त्यापैकी प्रत्येकी वीस टक्के खर्च हा राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. उर्वरित 60 टक्के निधी हा कर्ज रुपाने उभारण्यात येणार आहे.
पुणे व नाशिक ही मोठी शहरे आहेत. सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांत अग्रेसर असणारी ही शहरे आहेत. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. आजच्या बैठकीत तांत्रिक विषयांवर चर्चा करून या प्रकल्पाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
– अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
पुणे नाशिक रेल्वे मार्ग 235 किलोमीटर लांबीचा
रेल्वे मार्ग पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
रेल्वेचा 200 किलोमीटर प्रतितास वेग
पुणे -नाशिक अंतर अवघ्या दोन तासांवर येणार
पुणे-नाशिकदरम्यान 24 स्थानकांची आखणी
प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा