पिंपरी – मागील वर्षभरापासून चर्चेत असलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोकरभरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षेतील उत्तीर्ण व कागदपत्र तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्त करून घेण्यास महापालिका निवड समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. २९) मान्यता देण्यात आली. आता प्रशासनामार्फत अंतिम निकाल जाहीर करून त्यांना रूजू करून घेतले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेगवेगळ्या १५ पदांच्या ३६८ जागांसाठी मे २०२३ महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रत्यक्षात ५५ हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर ११ पदांसाठी ३५ जागांचा निकाल ७ ऑगस्टला जाहीर झाला. पात्र सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यांनी परीक्षा दिलेल्या संस्था शासनमान्य असल्याचे तपासणी करण्यात आली.
त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक बुधवारी पार पडली. यामध्ये कागदपत्राची पुर्तता करणा-या उमेदवारांची निवड करण्यास समितीने मान्यता दिली. त्यानुसार अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेत सेवेत पदानुसार नियुक्त करून घेण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
पालिकेला मिळणार मनुष्यबळ
या भरतीमुळे अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा विविध पदांवर पिंपरी-चिंचवड पालिकेला या भरतीनंतर मनुष्यबळ मिळणार आहे.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यास मान्यता मिळाली आहे. अंतिम निकाल जाहीर करून या उमेदवारांना रूजू करून घेतले जाणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका