ग्रेट पुस्तक : द ब्रेडविनर (डेबोरा एलिस)

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार

आज मी ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे, त्याचे नाव आहे “द ब्रेडविनर. “अफगाण मुलीच्या धाडसाची ही सत्यघटना आहे. काबुलवर तालिबानी लोकांनी कब्जा केला अन्‌ सुरू झाला नरसंहार यात स्त्रियांना विशेष त्रास देण्यात येत होता.. कुठलीही स्त्री बुरखा न घेता बाहेर दिसली की तिला अन्‌ तिच्या घरच्यांना अमानुष मारहाण करून मारले जात होते. कोणत्याही क्षणी कुठूनही बॉम्ब येत असे, अन्‌ एका क्षणात सर्वस्व उद्‌ध्वस्त होत असें. तालिबान्यांचा छळ एवढा वाढला होता की घरातील कर्ते पुरुषही छोट्याशा कारणावरून उचलून नेले जात अन्‌ कैदेत टाकले जात.

घरातील पुरुषांची संख्या कमी होत चालली होती. स्त्रियांना पुरुषांशिवाय बाहेर पडता येत नसे. अशा वेळी अन्नपाण्यावाचून मरावे लागत असे. घराची एक खिडकीसुद्धा उघडी ठेवता येत नसे. अंधार, घाण, कुजकी शिळी हवा एवढेच काय ते घरात भरभरून होते.. अशाच एका कुटुंबाची कहाणी इथे लेखिकेने मांडली आहे. “परवाना” नावाची ही अफगाण मुलगी उच्चशिक्षित आईवडील अन्‌ तीन भावंडांसोबत राहत असते. बॉम्ब हल्ल्यात पाय गमावलेले वडील घरातील एकमेव कमावते. पायाने नीट चालता न येणाऱ्या वडिलांना परवानाचा आधार. घरातील वस्तू विकून अन लोकांची पत्रं वाचून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. त्यातच तालिबान्यांची यांच्यावर नजर पडते अन कोणत्याच कारणाशिवाय त्यांना अमानुष मारहाण करून कैद केले जाते. घरात सगळ्या स्त्रियाच उरतात. कोणी बुरख्याशिवाय अन पुरुषांशिवाय बाहेर पडणे म्हणजे मरणचं अशा परिस्थितीत अंगाने न भरलेली अन्‌ छोटीशी दिसणारी परवाना हिलाच मुलगा बनवून बाहेर उदरनिर्वाह करण्यासाठी पाठवण्याचे ठरवतात.

केस कापून, मुलांचे कपडे घालून चार पाच माणसाचे कुटुंब चालवण्यास अकरा बारा वर्षाची मुलगी सिद्ध होते अन चालू होतो तिचा लढा जगण्यासाठी, जगवण्यासाठी. यातच तिला एक तिच्याच वर्गातील मैत्रीण तिच्यासारखेच मुलगा होऊन काम करताना भेटते. अन्‌ दोघी एकमेकींना आधार देत मरण चुकवत कुटुंबाचे पालन पोषण करत जगण्यासाठी धडपड करत राहतात. पैशासाठी स्मशानात जाऊन हाडे गोळा करून पैसे मिळवण्याची धडपड काळजाचा ठाव घेते. यातच एक दिवस परवानाचे अब्बू परत येतात. पण नेमके त्याच वेळी तिची आई अन्‌ भावंडे मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी मझार या तालिबानमुक्त शहरात गेलेल्या असतात. पण दुर्दैव असें की तालिबान्यांनी तिकडे ही कब्जा केल्याचे कळते त्यांच्या शोधात परवाना अन तिचे अब्बू निघतात. तिची मैत्रीण मोकळा श्‍वास घेण्यासाठी हा देश सोडून फ्रान्सला जाण्याचे स्वप्न पाहत असते. अन बरोबर वीस वर्षांनी ठरलेल्या ठिकाणी भेटण्याचे ठरवून पुढील प्रवासासाठी निघतात.पुढील कहाणी जाणून घेण्यासाठी पुस्तकं वाचावे लागेल.

पुस्तकं खूप छान आहे. जगण्यासाठी लहान मुलींनी केलेली धडपड खरंच कौतुकास्पद वाटते. अफगाणिस्तानमधील लोकांनी सहन केलेला छळ अंगावर काटा आणणारा आहे. परवानासारख्या धाडसी मुलीने केलेल्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे.”डेबोरा एलीस”ही मूळ इंग्रजी लेखिका असून या पुस्तकाचा मराठी अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला आहे. लेखिकेने या पुस्तकाची पुढील कहाणीसुद्धा लिहिली आहे. परवाना आईबहिणीला शोधून काढते का? या मैत्रिणी पुन्हा भेटतात का?. अशा अनेक प्रश्‍नांची उकल करणारे नंतरचे पुुस्तक आहे. द ब्रेडविनरचे प्रकाशन “मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले असून, एका लहान मुलीच्या संघर्षाची सत्यघटना नक्की वाचा.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)