स्वयंपाक – नियोजन एक कला

वर्षानुवर्षे भारतीय स्त्रिया या स्वयंपाकघरात रमलेल्या दिसतात. गृहिणी ही भारतीय स्त्रीची सर्वात मोठी ओळख. आणि घरातलं “स्वयंपाकघर’ हे खरं स्त्रीचं राज्य असतं. अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत. पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या “चूल आणि मूल’ या परिघातून, आजची स्त्री बाहेर पडली असली तरी ती अद्यापही स्वयंपाक घरापासून दूर झालेली नाही. तिचे स्वयंपाकघरातील अधिराज्य अबाधित आहे. आज ती अर्थाजन करीत असली, तरी अर्थार्जनाबरोबर आपली गृहिणीची भूमिका पार पाडत असताना तिला तिच्या या दुहेरी कसरतीला सतत सामोरे जावे लागते. बाहेर उच्च पदावर काम करताना, विविध क्षेत्रे काबीज करताना, अनेक आव्हानांना तोंड देताना, स्त्रीच्या मनात तिच्या घराबद्दलची ओढ नेहमी कायम असते आणि आपल्या नोकरी, व्यवसायाप्रमाणेच स्वयंपाकघरात ती आजही तितकीच रमते. मनापासून आपले काम करते. साऱ्या कुटुंबाचे पोट गृहिणीच्या जिवावरच चालते, ही गोष्ट तर अगदी सत्य आहे.

पूर्वीची चूल आता कालजमा झालेली आहे. आता स्वयंपाक घराची किचन झालेली आहेत. आणि आता ही किचन्स अधुनिक उपकरणांनी सुसज्ज झाली आहेत. आधुनिक उपकरणांनी गृहिणीचे कष्ट कमी झाले आहेत. पण रोजचा स्वयंपाक करण्यासाठी उत्तम नियोजन हे घरात करावेच लागते. पोळी करण्यासाठी बाई ठेवता येते, पण त्यासाठी बाजारातून गहू दळून किंवा तयार आटा तरी आणावाच लागतो. तेल हवं, तवा, परात, पोलपाट, लाटणे या वस्तू जागेवर हव्यात. साधी भाजी करायची तर ती आधी बाजारातून आणावी लागते. मग ती धुवा, चिरा त्यासाठी लागणारे तिखट, मीठ, मसाला, गूळ या पदार्थाची तयारी असावी लागते. आता तिला हे सारे व्यवस्थापन करावे लागते.

दररोज लागणाऱ्या फक्त पोळी-भाजीसाठी किती तरी तयारी, सामग्री जमवावी लागते. तू घरातच असतेस, तर एखादी गोष्ट झाली नाही तर स्त्रीला टोकले जाते. पण एखाद्या छोट्या गोष्टीसाठी तिला किती नियोजन करावे लागते. हे इतरांना समजत नाही.

रोजच्या स्वयंपाकाबरोबर सणवार, पाहुणे, इतर कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन समारंभासाठी घरातील बाईला फार आधीपासून तयारी करावी लागते. मग प्रत्यक्ष स्वयंपाक करणे, पाहुण्यांशी बोलणे आणि त्यांना आनंदाने खाऊ घालणे या सर्वांकरिता खूप कष्ट आणि नियोजन लागते.

बाकी सर्व नियोजन, आराखडा, घराची मांडणी नुसती चांगली असून भागत नाही. प्रत्यक्ष पदार्थ हे रुचकर बनवावे लागतात. म्हणूनच म्हणते स्वयंपाकासाठी फक्त नियोजनच नाही तर उत्तम स्वयंपाक येणे हीसुद्धा एक कला आहे.

संगीत, नृत्य, चित्रकला, वादन आणि इतर कोणत्याही कलेसाठी जशी साधना लागते. तशी “स्वयंपाक’ करण्यासाठी वर्षानुवर्षे स्त्रिया राबत असतात. जेव्हा स्त्रिया आपल्या लग्नाची 40 किंवा 50 वर्षे पूर्ण करताना दिसतात तेव्हा खरंच त्यांना सलाम करावासा वाटतो. अखंड इतकी वर्षे दररोज न चुकता एखादी गोष्ट करणे खरेच सोपे नाही. नोकरीत तरी रिटायरमेंट असते. पण स्वयंपाकघरातून नाही.

पण एखादी स्त्री हे सर्व आनंदाने करीत असते ते आपल्या कुटुंबासाठी त्या कुटुंबातील व्यक्तींनी तिच्या या योगदानाची थोडी जाणीव जरी ठेवली तरी समाधानाने तृप्त होते. तिला फक्त त्यासाठी दोन गोड शब्दांची अपेक्षा असते. कारण हा संसार तिने मनाने स्वीकारलेला असतो. म्हणूनच बहिणाबाई चौधरी या एका स्त्रीनेच समस्त स्त्रियांसाठी संसाराचे वर्णन केले आहे ना-
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)