करोना संसर्ग नाही किंवा आटोक्यात असणाऱ्या गावांची माहिती मागवली
पुणे – मुदत संपलेल्या ग्रामपंचायत हद्दीत करोना संसर्ग नाही किंवा आटोक्यात आहे. त्या ठिकाणी मतदान घेणे शक्य आहे की नाही याचा अहवाल तत्काळ सादर करावा अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा ग्रामपंचायतींचे बिगुल वाजणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. निवडणूक होणार, तर कधी याबाबतही इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे.
लॉकडाऊन पार्श्वभूमीवर एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपेल त्याठिकाणी प्रशासकाची नेमणूक करावी. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे ग्रामपंचायतींची मुदत टप्प्याटप्प्यात संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक केली जात आहे. दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. तर राज्य निवडणूक आयोगही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याबाबत विचारार्थ आहे.
मात्र, राज्यातील गावांमध्ये करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातील काही ग्रामपंचायतींमध्ये करोनाचा संसर्ग नाही, तर अनेकांनी हा संसर्ग आटोक्यात आणला आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये करोना संसर्ग नाही किंवा आटोक्यात आहे, अशा ठिकाणी मतदान घेणे शक्य आहे का, याचा अहवाल येत्या 21 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगास सादर करावा. जेणेकरून आयोगाला निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेणे शक्य होईल, असे आदेशामध्ये म्हटले आहे.
नवीन वर्षात निवडणुका होण्याची शक्यता नाही
जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतींची निवडणूक घेता येईल, याबाबत राज्य निवडणूक आयोगाची चाचपणी सुरू आहे. त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. पुणे जिल्हा सध्या करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील दोन महिने तरी निवडणुका होतील, असे वाटत नाही. तर काही ग्रामपंचायतींमध्ये आजूनही करोनाचा शिरकाव होवून दिलेला नाही. त्यामुळे असा ग्रामपंचायतींची माहिती पाठवली गेली तरी, निवडणुका नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनानुसार पुढील दोन दिवसांत ग्रामपंचायतींची माहिती मागविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल.
– संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पंचायत) जिल्हा परिषद, पुणे