महाळुंगे इंगळे -दोन पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे आणि एका सराईत गुन्हेगारास रासे (ता. खेड ) भागातून अटक करण्यात आली आहे. संबंधित सराईत गुन्हेगाराने ही घातक पिस्तुले विक्रीसाठी आणली होती; त्याआधीच चाकण पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेत गुरुवारी ( दि. 27 ) गजाआड केले.
ईश्वर उर्फ अक्षय आनंदा पाटील (वय 32, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीची दोन देशी बनावटीची प्रीस्टल व मॅक्झिममध्ये चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांना त्यांच्या गुप्त माहितगाराने माहिती दिली की, एक मेहंदी रंगाचा शर्ट घातलेला तरूण आपल्याजवळ पिस्तूल बाळगून रासे येथे विक्रीसाठी येणार आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर चाकण – शिक्रापूर रस्त्यावर पाटलाचा ढाबा हॉटेल जवळ रासे गावाच्या हद्दीत सापळा रचून ईश्वर पाटील यास ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे अशी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची शस्त्रे मिळून आली. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.