पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी ः तिघांवर गुन्हा दाखल
महाळुंगे इंगळे-लग्नाचे आमिष दाखवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेट्रोल टाकून तीला जिवंत जाळण्याची धमकीही देण्यात आली. चाकण येथील बालाजीनगर व चिखली येथे सप्टेंबर 2016 ते 25 डिसेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 27) नराधमासह त्याचे वडील व बहिण अशा एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुलबर्गा जिल्ह्यातील 25 वर्षीय पीडित तरुणीने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अभिषेक राजेंद्र शेलार, त्याचे वडील राजेंद्र शेलार व बहीण सोनाली राजेंद्र शेलार (सर्वजण रा. चिखली, ता. हवेली) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी चाकण औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत रोजंदारीने कामाला जात होती. त्यावेळी अभिषेक व तिची कामाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यावेळी त्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत मी तुला सुखात ठेवीन, तुझ्याशी लग्न करीन, तू तुझ्या पतीला सोडून घटस्फोट दे, असे पटवून सप्टेंबर 2016 ते 25 डिसेंबर 2019 पर्यंत वेळोवेळी चाकण येथे पीडितेच्या घरी व चिखली येथेही तिच्यावर अतिप्रसंग केला.
या प्रकारा नंतर ती गरोदर राहिल्याने तिने हा प्रकार अभिषेक याचे वडील राजेंद्र शेलार व बहीण सोनाली यांना सांगितला असता त्यांनी तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक विशाल धांडगे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.