सासवड/ बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये पिकत असलेल्या अंजिराला आता जीआय मानांकन मिळाले आहे. प्रमाणपत्राचे वितरण नुकतेच सासवड येथील पांडुरंग भवन येथे करण्यात आले. 512 शेतकऱ्यांना जीआय मानांकनाकृत अंजीर पीक प्रशस्तीपत्रक मंजूर केले आहे. तालुक्यातील 400 शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्रक (दि.30) रोजी वितरित केले आहे.
सासवड येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ पुणे यांच्या सहकार्याने पुरंदर अंजीर या भौगोलिक चिन्हांकन/मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रसार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण अधिकृत वापर करता नोंदणी अभियान व भौगोलिक चिन्हांकण/मानांकन प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम झाला.
देशभरातील एकूण 129 भौगोलिक मानांकनामध्ये महाराष्ट्राचा 26 विविध मानांकन रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
त्यामध्ये अंजीर केवळ देशभरातील सासवड पुरंदरमधील अंजीर हे राज्यनिहाय कृषी उत्पादनास प्राप्त भौगोलिक मानांकन असल्याची माहिती राज्यस्तरीय सल्लागार पुणेचे गोविंद हांडे यांच्याकडून दिले आहे. यावेळी आमदार संजय जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे,
माजी सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे डॉ. दशरथ ढवाळ, राज्यस्तरीय सल्लागार गोविंद हांडे, शास्त्रज्ञ अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे युवराज बालगुडे, अंजीर निर्यातदार अध्यक्ष, पुरंदर हायलॅंड रोहन उरसळ, युवा कृषी उद्योजक परीक्षक डोंबे पाटील, खोर फुड्स लिमिटेडचे समीर डोंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर कृषी अधिकारी सूरज जाधव, आप्पासाहेब काळभोर, रामचंद्र खेडेकर, दिलीप जाधव, प्रदीप होमन यांच्यामार्फत केले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रॅंड होणार
भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होऊन, तर नोंदणीकृत कृषी माल हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रॅंड होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जीआय मानांकनामुळे पुरंदरच्या अंजीरास जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. 2014 साली पुरंदरच्या अंजीरात जीआय मानांकन मिळाले होते परंतु 2022 साली अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या हातात प्रमाणपत्र मिळाले आहे.