नवी दिल्ली – बलाढ्य इंटरनेट कंपनी गुगल भारतातील एअरटेल या कंपनीत पुढील पाच वर्षात एक अब्ज डॉलरची म्हणजे साधारणपणे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातील 700 दशलक्ष डॉलर एअरटेल मधील सव्वा टक्के भागभांडवल खरेदी साठी वापरण्यात येणार आहेत. उरलेली रक्कम गुगल आणि एअरटेलदरम्यान झालेल्या व्यावसायिक कराराच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे.
एयरटेल आणि गुंतवणूक गुगल भारतामध्ये फाईव्ह जी सेवा कार्यक्षमरीत्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एअरटेलचे सव्वा टक्के भागभांडवल गुगल कंपनीला विकण्यासाठी एअरटेलच्या संचालक मंडळाने अगोदरच परवानगी दिलेली आहे.
भारत सरकारने डिजिटल इंडिया ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी गुगल भारतातील विविध कंपन्यांमध्ये दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा भाग म्हणून एअरटेल मध्ये गुंतवणूक करण्यात आली असल्याचे गुगल कंपनीने स्पष्ट केले आहे. गुगल कंपनीने याअगोदरच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये साडेचार अब्ज डॉलरची गुंतवणूक जाहीर केलेली आहेत.
भारतामध्ये मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या वेगात वाढत आहे. या मोबाईल फोन धारकांनी 5-जी फोनचा वापर करावा. त्यामुळे त्यांना इंटरनेट सेवा वापरता येतील यासाठी गुगल आगामी काळामध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे गूगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले होते.