नवी दिल्ली : गुगलने भारतीय गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्र नाथ बोस यांना डूडलद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. आजच्या या खास डूडलमध्ये डॉ. बोस एक प्रयोग करताना दाखवले आहेत. 1924 मध्ये याच दिवशी, डॉ. बोस यांनी त्यांचे क्वांटम फॉर्म्युलेशन अल्बर्ट आईन्स्टाईन यांना पाठवले होते, ज्यांनी याला ‘क्वांटम मेकॅनिक्स’मधील एक महत्त्वपूर्ण शोध म्हणून मान्यता दिली.
सत्येंद्र नाथ बोस हे प्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रात दोन प्रकारचे रेणू आहेत. एक आहे बोसॉन आणि दुसरा फर्मिअन्स. यापैकी ‘बोसॉन’चे नाव डॉ. सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 1920 च्या दशकात ‘क्वांटम मेकॅनिक्स’मधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते विशेषतः ओळखले जातात.
डॉ.सत्येंद्र नाथ यांनी शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्यासमवेत ‘बोस-आइन्स्टाईन स्टॅटीस्टिक्स’ आणि ‘बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट’ सिद्धांताची निर्मिती केली. डॉ. बोस यांनी एका उपअणु कणाचा शोध लावला होता, ज्याला त्यांच्या सन्मानार्थ ‘बोसॉन’ असे नाव देण्यात आले होते.
सत्येंद्र नाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी बंगाल राज्यातील कोलकाता येथे झाला. 1909 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांनी पाचवा क्रमांक पटकावला होता. यानंतर त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. येथे सत्येंद्र नाथ बोस यांना जगदीशचंद्र बोस, शारदा प्रसन्न दास आणि प्रफुल्ल चंद्र रे यांसारख्या विद्वानांकडून ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली.