पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुण्यातील विद्या प्रसरणी सभा या संस्थेच्या भारत इंग्लिश स्कूल या शाळेतील १९७४च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी नुकताच आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. यावेळी या बॅचला अध्यापन करणारे शिक्षकही उपस्थित होते.
यावेळी श्यामकांत अत्रे, रवींद्र उपाध्ये, भोमे व गोडबोले या चारही शिक्षकांनी आपल्या विविध आठवणी सांगून सर्व उपस्थितांना पन्नास वर्षे मागे नेले. अत्रे हे इंग्लिश विषय तर उपाध्ये व भोमे हे विज्ञान आणि गोडबोले हे गणित, विज्ञान विषय शिकवत होते.
यावेळी घनश्याम आगरवाल, सीमा जोगळेकर, पुष्पा कनोजिया, संभाजी काकडे, प्रसाद आंबीकर, राजेंद्र खांडेकर, अनिल शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित प्रत्येक अध्यापक व विद्यार्थ्यास यावेळी सुवर्णमहोत्सवानिमित्त आकर्षक स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी एकूण पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते. वयाच्या पासष्टीनंतर पुन्हा एकदा शालेय जीवनाचा आनंद घेता आला याचे समाधान उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. याच कार्यक्रमात एक विद्यार्थी अनिल शिंदे लिखित ‘मित्रांच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन अध्यापकांच्या शुभ हस्ते करण्यात आले.