Stock Market: निर्देशांकांचे विक्रमावर विक्रम

मुंबई – चीनचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भारतीय शेअर बाजारात खरेदी चालूच राहिली. त्यामुळे सलग सातव्या दिवशी निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर विराजमान झाले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 459 अंकांनी उसळून 61,765 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 138 अंकांनी वाढून 18,477 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.

इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅंक, मारुती सुझुकी, स्टेट बॅंक, आयटीसी, ऍक्‍सिस बॅंक या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. महिंद्रा, एशियन पेंट्‌स, डॉक्‍टर रेड्डीज, बजाज ऑटो, भारती एअरटेल या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

जुलै -सप्टेंबर या तिमाहीत चीनचा विकास दर केवळ 4.9 टक्के इतका नोंदला गेला आहे. हा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे आशियाई आणि युरोपीयन शेअर बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आले. मात्र तरीही भारतीय शेअर बाजारात सरकारी बॅंका,धातू, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी चालूच राहिली.

निर्देशांक वाढत असूनही रुपयाचे मूल्य मात्र 9 पैशांनी कमी होऊन 75.35 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. भारताच्या दृष्टीकोनातून आणखी एक नकारात्मक बाब म्हणजे जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर आता 85.56 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के इतके कच्चे तेल परकीय चलन मोजून खरेदी करीत असल्यामुळे भारतामध्ये महागाई वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.