नवी दिल्ली – अक्षय तृतीयेला दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर तब्बल 745 रुपयांनी कमी होऊन 50,936 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दरही 1,228 रुपयांनी कोसळून 63,028 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कोसळून 1,880 डॉलर व चांदीचा दर 22.62 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. काही तासात अक्षय तृतीया चालू होणार असतानाच भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्यामुळे ग्राहकांना अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
मात्र तरीही सोन्याचे आणि चांदीचे दर तुलनेने जास्त आहेत. त्यामुळे ग्राहक प्रतीकात्मक पातळीवर तरी सोन्याची खरेदी करण्याची शक्यता असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. एकूण जागतिक परिस्थिती सोन्यासाठी नकारात्मक असल्यामुळे जागतिक आणि भारतातील वायदे बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या.
त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्येही सोने आणि चांदीचे दर कमी झाले असल्याचे पटेल यांनी सांगितले. सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याचे विश्लेषण करताना ते म्हणाले की सध्या सर्वच बाजारात अतिशय अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेची व्याजदर वाढ आणि रशिया- युक्रेन दरम्यानचे युद्ध हे यासाठी महत्त्वाची कारणे आहेत.
काल आणि आज डॉलर वधारला. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढल्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक कमी होऊन सोन्याचे दर कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सोन्यासाठी लघु किंवा मध्यम पल्ल्याचे भाकीत करणे अवघड असल्याचे ते म्हणाले.