नवी दिल्ली – जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये उत्तरोत्तर घट होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी भारतीय सराफत सोन्याचे दर कमी झाले.
सोन्याचा दर 71 रुपयानी कमी होऊन 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र चांदीचा दर 263 रुपयांनी वाढून 64,168 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,826 डॉलर व चांदीचा दर 24.78 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याच्या दरावर जागतिक बाजारात परिणाम होत आहे, त्यामुळे भारतातही सोन्याचे दर कमी होत आहेत. सध्या सोन्याचे दर कमी पातळीवर असल्यामुळे भारतामध्ये लग्नासाठी आणि उत्सवासाठी सोने खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.