मुंबई – बहुचर्चित पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय आज दिल्लीच्या लोकनायक भवनात ईडीसमोर हजर होणार आहे.पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. याप्रकरणी अभिषेक बच्चनचीही चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्याला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी तयार केली आहे.
दरम्यान, ऐश्वर्याला ईडी चौकशीला सामोरे जावे लागले असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत आक्रमक होत सरकारवर हल्ला केला. जया बच्चन बोलत असताना काही सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने खडाजंगी झाली. त्यातूनच जया बच्चन भडकल्या आणि ‘भाजपचे वाईट दिवस आता येणार आहेत.
हा माझा शाप आहे’, असे विधान त्यांनी केले. ‘तुमच्याकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा ठेवणार. तुम्हाला चर्चाच होऊ द्यायची नाहीय. आता आम्हा सर्वांचा गळाच घोटा, म्हणजे झाले’, असे नमूद करत सभापती काहीच ऐकून घेत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.