पिंपरी – तळवडे औद्योगिक क्षेत्रासह आसपासच्या परिसराचा वेगाने विकास होत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या तळवडे परिसरास उपलब्ध असणाऱ्या वीज यंत्रणेतून वीजपुरवठा करणेकामी मर्यादा येत आहेत. त्यामुळे तळवडे एमआयडीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या ताब्यातील (कॅनबे चौक) जागा उपलब्ध करून महावितरणाचे वीज उपकेंद्र उभारणी करिता जागा मिळण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी केली आहे.
यावरती तातडीने उपमुख्यमंत्री पवार यांनी एमएसईबी विभागाला केंद्र उभारणी व एमआयडीसी अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे तातडीने आदेश दिले. तळवडे परिसरात सद्यःस्थितीत काही भागात वीजपुरवठा करणारी यंत्रणा खराब झालेली आहे. त्यामुळे तळवडे औद्योगिक परिसर व इतर रहिवासी भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना मुख्यत्वे करून लघुउद्योजक यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे तसेच भविष्यातील येणारी वीज मागणी पूर्ण करणेकामी कॅनबे चौक, तळवडे एमआयडीसी येथे वीज उपकेंद्र उभारणी करणे काळाची गरज आहे.
तळवडे औद्योगिक व आजूबाजूच्या परिसराचा विचार करून प्रस्तावित नवीन उपकेंद्राचा प्रकल्प अहवाल महावितरण विभागाने तयार केलेला आहे. तथापि, त्यास जागा उपलब्ध झालेली नसल्याने अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कॅनवे चौक तळवडे येथील एमआयडीसीच्या ताब्यातील वाटप न केलेले भूखंड शिल्लक आहेत. परिसरास भविष्यातील वीज मागणी पूर्ण करण्यासाठी कॅनबे चौकात महावितरणच्या मागणीनुसार आवश्यक क्षमतेचा भूखंड वीज उपकेंद्र उभारणी करून महावितरणाचे वीज उपकेंद्र उभारणीचा प्रश्न सुटणार आहे.