सातारा – खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव यावेळी लाेकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने सातारा लाेकसभा मतदारसंघासाठी नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी येथील पदाधिकारी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजित पाटणकर यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली. प्रसंगी खा. शरद पवार यांनी साताऱ्यातून लढून बालेकिल्ला मजबूत करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
जिल्ह्यातील विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी नवीन चेहरा देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. श्री. पवार यांचे हेलिकॉप्टरने सकाळी अकराच्या सुमारास साताऱ्यात आगमन झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. पवार बैठकीसाठी साईसम्राट मंगल कार्यालयात दाखल झाले. वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील, दीपक पवार, सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी श्री. पवार यांनी विभागनिहाय आढावा घेतला. कराड उत्तर व कराड दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. या उमेदवारीसाठी सर्वाधिक मागणी बाळासाहेब पाटील यांच्या नावाला झाली. कोरेगाव मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्याची मागणी केली. शरद पवार यांनीच साताऱ्यातून निवडणूक लढावी, अशी काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.
प्रकृती कारणास्तव श्रीनिवास पाटील यांची माघार
सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपण प्रकृतीच्या कारणास्तव यावेळी निवडणूक लढणार नाही, असे बैठकीत जाहीर केले. या मतदारसंघात नवीन उमेदवार द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. याबाबत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लढावे अशी मागणी केली.
श्रीनिवास पाटील यांना पाटणमधून विरोध
शरद पवार यांनी प्रथम विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. यामध्ये पाटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाला पाटणमधील पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध दर्शवला. यापूर्वीही शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सत्यजित पाटणकर यांनी श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवला होता. आता पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने पाटणकर व खा. पाटील यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.