राजगुरुनगर, (प्रतिनिधी)- आज मुली किंवा महिला सक्षम होणे गरजेचे आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला थोपवून धरणे किंवा समोर जाणे इतकी शारीरिक व मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलींनी स्वतःला सक्षम करणं तसेच स्वतःचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य राखणं गरजेचं आहे, असे मत खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केले.
दावडी (ता. खेड) येथे आम्ही दावडीकर ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न झाला. यावेळभ मागर्दशन करताना पाटील बोलत होेते. दावडी येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालयाच्या आवारात मुली व महिलांच्या स्वसंरक्षणासाठी 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन संस्था पुणेचे प्रशिक्षक अशोक महाराज पवार, बाबासाहेब दिघे व प्रशांत मुंगसे यांनी मुलींना लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला व पाश चक्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले. 110 मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. शुक्रवार (दि. 16) रोजी प्रशिक्षण शिबिराची सांगता करण्यात आली.
आम्ही दावडीकर ग्रुपचे बाबासाहेब दिघे, सदाशिव आमराळे, संतोष गाडगे, गणेश बैरागी, विठ्ठल फडतरे, दादाभाऊ डुंबरे, संतोष क्षीरसागर, रमेश म्हसाडे, संतोष बेल्हेकर, गणेश साळुंके, राजेश कान्हूरकर व राहुल जाधव यांनी उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब दिघे, सूत्रसंचालन विलास बरबटे व मुख्याध्यापक दादाभाऊ फापाळे यांनी आभार मानले.