ढाका – आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी प्रेमात वेडे झालेले लोक काय वाट्टेल ते करू शकतात. याची कितीतरी उदाहरणे आपण चित्रपटांमधून बघितली असतील. मात्र प्रत्यक्ष्यात अशाच एका वेड्या धाडसाचे उदाहरण बांगलादेशातील एका युवतीने करून दाखवले आहे. भारतातील आपल्या कधी न पाहिलेल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी ही युवती चक्क भारतात पोहत आली. मात्र देशात अवैधपणे प्रवेश केल्याबद्दल नरेंद्रपोरच्या पोलिसांनी तिला अटक केली आहे.
कृष्णा मोंडल असे या युवतीचे नाव आहे. सुंदरबनमधील जंगलातून तिने आपला जलप्रवास सुरू केला. या भागातून वाहणाऱ्या मातला नदीतून सुमारे तासाभराने पोहत भारताच्या किनाऱ्यावर पोहोचली. पश्चिम बंगालमधील साऊथ 24 परगणा जिल्ह्यातील कैखाली गावात तिचा मित्र अभिक मोंडल कार घेऊन तिची वाट पहात बसला होता. तेथून हे दोघेही कारमधून कोलकात्यात गेले आणि मंदिरात जाऊन त्यांनी विवाह केला.
या दोघांची पहिली ओळख फेसबुकवर झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय केला. मात्र अभिककडे पासपोर्ट नसल्यामुळे तो बांगलादेशात जाऊ शकत नव्हता. मात्र कृष्णाने धाडसी निर्णय घेऊन आपल्या मित्राला भेटण्याचे ठरवले. या धाडसाची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कृष्णाला शोधून काढले आणि तिला अटक केली. आता तिला बांगलादेशच्या उच्चायुक्तांच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे.