धुळे – एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळे त्यांना पक्षाने हाकलून दिल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
महाजन पुढे बोलताना म्हणाले की, दाऊदच्या संभाषणामुळे आपल्याला पक्षातून काढले असे एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले आहेत. सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.
भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळे एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावे हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही. त्यामुळे वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत.
खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नाही. ते एकेकाळी आमच्यासोबत होते त्यामुळे ते आमचे सहकारी होते. मात्र, आता त्यांची कीव करावी वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ते आता वैफल्यग्रस्त झाल्याची टिकाही त्यांनी केली आहे.