52 हजार 702 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणार लस; सहा दिवसांत लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन
पुणे – शहरात करोना लसीकरणासाठी महापालिकेने 15 केंद्र निश्चित केली आहेत. त्याअंतर्गत 16 जानेवारीपासून येथे प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे. यात पुढील सहा दिवसांत 52 हजार 702 खासगी आणि शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले. 15 केंद्रांमध्ये 5 खासगी, तर 10 शासकीय हॉस्पिटल्स आहेत.
करोना रोधक लसीकरणासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. यासाठी 99 बुथ असतील. पहिल्या टप्प्यात पालिकेने 16 केंद्र निश्चित केली होती. त्यात, शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचाही समावेश होता.
मात्र, या सेंटरची केंद्र सरकारच्या लसीकरण पोर्टलवर नोंदणी झालेली नसल्याने 15 ठिकाणीच हे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाची आवश्यक तयारी जवळपास पूर्ण झाल्याचा दावाही अग्रवाल यांनी यावेळी केला.
1 लाख 16 हजार लसींची गरज
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाच्या 2 लसी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या 52 हजार 702 कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने 1 लाख 15 हजार 825 डोस मागवले आहेत. यात 10 टक्के डोस इतर कारणास्तव वाया जातील, असा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे. पहिल्या डोससाठी सरासरी 6 दिवसांचा कालावधी प्रशासनाने गृहीत धरला आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. लस देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये 11,074 शासकीय, तर 41 हजार 628 खासगी वैद्यकीय कर्मचारी आहेत.
या 15 ठिकाणी होणार लसीकरण
सुतार दवाखाना – कोथरूड
कमला नेहरू हॉस्पिटल – मंगळवारपेठ
राजीव गांधी हॉस्पिटल – येरवडा
कलावती मावळे हॉस्पिटल – नारायण पेठ
सदगुरू शंकर महाराज दवाखाना – बिबवेवाडी
बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल – मित्रमंडळ चौक
शिवरकर हॉस्पिटल – वानवडी
सहदेव निम्हण प्रसूतीगृह – पाषाण
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय – पुणे स्टेशन
डॉ. दळवी रुग्णालय – शिवाजीनगर
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय – एरंडवणे
भारती हॉस्पिटल – धनकवडी
नोबेल हॉस्पिटल – हडपसर
रूबी हॉल – पुणे स्टेशनजवळ
जोशी हॉस्पिटल – भांडारकर रस्ता
ग्रामीण भागातील 43,356 कर्मचाऱ्यांचे लसीकरण
ग्रामीण भागातील 43 हजार 356 आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनारोधक लस देण्यात येणार आहे. यासाठी 944 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 23 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. लसीकरणामध्ये प्रत्येकी 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. यासाठी 91 हजार 320 डोस आणि 9 हजार 123 व्हायल्सची आवश्यकता आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात इतर आजार असलेले व वयोवृद्धांना प्राधान्य दिले जाणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यासाठी उपलब्ध कर्मचारी पाहता, सुमारे 90 ते 100 दिवस लागण्याचा अंदाज आहे.