चेन्नई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या जर्मन विद्यार्थ्याला देशाबाहेर घालवून देण्यात आले आहे. “ब्युरो ऑफ इमिग्रेशन’च्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्याला त्या संदर्भातील सूचना केल्यावर त्याला देशाबाहेर घालवून देण्यात आले आहे.
जॅकोब लिंडेनथाल असे या विद्यार्थ्याचे नाव असून आयआयटी मद्रासच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थी आदलाबदलीच्या उपक्रमानुसार तो भारतात आला होता. मात्र देशांतर्गत मुद्द्यांवरून निदर्शनांमध्ये भाग घेतल्यामुळे व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला देशाबाहेर जाण्यास सांगण्यात आले होते.
“का’विरोधी आंदोलनात भाग घेतल्याने त्याला निघून जाण्यास सांगितले, असे “आयआयटी’विद्यार्थी संघटनेच्या चिंता बार यांनी सांगितले. या संदर्भात “इमिग्रेशन’ अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
जॅकोब लिंडेनथाल हा जर्मनीमधील ड्रेस्डेनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी होता. आयआयटी मद्रास येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी यावर्षी जुलै महिन्यात तो भारतात आला आणि पुढच्या वर्षी त्याचा “एक्सचेंज’ कार्यक्रम संपणार होता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनामध्ये तो सहभागी झाला होता.
हिटलरच्या कारकीर्दीत 1933 ते 45 दरम्यान जर्मनीतील ज्यू लोकांवर झालेल्या नाझींच्या छळाचा अप्रत्यक्ष संदर्भ असलेला एक फलकही त्याने धरला होता. ज्युं विरोधातील छोट्या छोट्या उपायांकडे सुरुवातीला फारसे लक्ष वेधले गेले नव्हते. मात्र त्यामुळेच ज्यूंचे सामुदायिक हत्याकांड घडले होते, असे त्याने आंदोलनात सहभागी झालेल्या इतरांना सांगितले होते.
“1933 ते 45 पर्यंत आम्ही तेथेच होतो.’ असे त्याच्या फलकावर लिहीले होते. तर दुसऱ्या फलकावर “मतभेदांशिवाय लोकशाही नाही.’ असे लिहीले होते. नागरिकत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीविरोधात आयआयटी मद्रासच्या गजेंद्र सर्कल येथे झालेल्या निदर्शनातही जॅकोबने भाग घेतला होता.