माधव विद्वांस
जगाचा नकाशा पहिल्यांदा बनविणारे गेरहार्ट मर्केटर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 5 मार्च 1512 रोजी झाला. फ्लेमिश भूगोलवेत्ता, गणिती व मानचित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे मूळ नाव गेरार्ट क्रेमर असे होते. “क्रेमर’ या शब्दाचा फ्लेमिश भाषेत “फेरीवाला’ वा “व्यापारी’, असा अर्थ होत असून लॅटिन भाषेत व्यापाऱ्याला “मर्केटर’ असा शब्द आहे.आपल्या आडनावाचे त्यांनी लॅटिनीस्वरूपात “गेरहार्ट मर्केटर’ या नावाने सर्व लिखाण प्रसिद्ध केले. त्यांनी ख्रिस्तीधर्म सिद्धांत, द्वंद्ववाद व लॅटिन यांचे अध्ययन केले.
1530 मध्ये लूव्हॉं विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला व मानव्यविद्या आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये 1532 साली एमए ही पदवी संपादन केली. लूव्हॉं येथे सुप्रसिद्ध सैद्धांतिक गणितवेत्ते गेमा फिरिसियस यांच्या मार्गदर्शनाखाली मर्केटरचे शिक्षण झाले व तसेच भूगोल, नकाशाशास्त्र, गणित आणि ज्योतिषविज्ञान या विषयांतही नैपुण्य मिळविले. सुरुवातीला फ्लॅंडर्स प्रदेशाचे सर्वेक्षण त्यांनी 1537-40 या काळात पूर्ण केले व सर्वेक्षणाची काही साधनेही तयार केली. टॉलेमीच्या जगाच्या नकाशावर आधारित असा नकाशा त्यांनी 1538 मध्ये तयार केला.
वर्ष 1541 मध्ये त्यांनी 1.30 मी. परिघ असलेला पृथ्वीचा गोलही पहिल्यांदाच बनविला. ही त्यांची अनोखी कलाकृती खूपच गाजली. वर्ष 1551 मध्ये गोलाकार तारामंडळाची प्रतिकृतीपण तयार केली. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी मर्केटरने खगोलशास्त्रात व भूगोलशास्त्रामध्ये तसेच सर्वेक्षण साहित्य व शास्त्रीय उपकरण निर्मितीबाबत प्रगती साधली.
प्रॉटेस्टंट मताकडे त्यांचा ओढा होता. त्यामुळे सनातनी लोकांचा त्यांच्यावर रागही होता. त्यांच्यावर पाखंडीपणाचा आरोप ठेवण्यात आला व 1544 मध्ये त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तथापि, लूव्हॉं विद्यापीठाचे अधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने त्यांना फारसा त्रास न होता त्यांची सात महिन्यांनी कारावासातून मुक्तता झाली.अखेर मर्केटर 1552 मध्ये वास्तव्य करण्यासाठी ड्युइसबुर्क (प. जर्मनी) येथे गेले.
इजिप्तमधील क्लॉडियस टॉलेमी हे एक प्रमुख खगोल अभ्यासक व भूगोलकार होऊन गेले. पृथ्वीची एक फेरी तयार करण्यासाठी चंद्राला लागणारा वेळ त्यांनीच निश्चित केला.तसेच प्रकाशाचा नियम बनविला होता. त्यांनी भारतातही भेट दिली होती. रायगड जिल्ह्यातील काही बंदरे व गावांचा त्यांच्या नोंदीत उल्लेख आहे. त्यांनीही काही नकाशांची टाकणे तयार केली होती. त्यावर मर्केटर यांनी संस्कार करून पूर्ण जगाचा नकाशा तयार केला.
लवकरच मर्केटरचा सर्वत्र बोलबाला होऊ लागला. त्यांनी जर्मनीच्या ड्यूकला त्यांची व्याकरणशाळा व तिचा अभ्यासक्रम यांच्या उभारणीमध्ये बहुमोल सहकार्य दिले. ड्युइसबुर्क येथे त्यांनी एक मानचित्रकलाविषयक तंत्रनिकेतनही उभारले. 1554 मध्ये मर्केटरने दुसऱ्या शतकातील टॉलेमीच्या युरोपच्या नकाशावरून नवीन माहितीच्या आधारे, 15 तक्ते एकमेकांना जोडून प्रथम आधुनिक धर्तीचा युरोपचा नकाशा बनविला. त्यानंतर 1562 मध्ये 1564 मध्ये ब्रिटिश बेटांचा नकाशा तयार केला. त्यांचे निधन 2 डिसेंबर 1594 रोजी झाले.