वेलिंग्टन –न्यूझीलंडच्या ऑकलंड या मोठ्या शहरात पुन्हा करोनाचा उद्रेक आढळून आल्यानंतर पंतप्रधान जकिंदा आरडेर्न यांनी देशातील सार्वत्रिक निवडणुका चार आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निवडणुका पूर्व घोषित कार्यक्रमानुसार 19 सप्टेंबरला होणार होत्या त्या आता 17 ऑक्टोबरला होतील. पंतप्रधानांकडे निवडणुका 2 महिने पुढे ढकलण्याची अधिकृत संधी होती; पण त्यांनी 4 आठवड्यांनीच हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
न्यूझीलंडमध्ये करोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. तेथील करोना रोगावर सरकारने पूर्ण नियंत्रण मिळवले असतानाच पुन्हा ऑकलंड शहरात या रोगाचे आणखी काही रुग्ण आढळून आले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीच निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली होती. देशातील करोना जवळपास हद्दपार झाल्यासारखी स्थिती निर्माण झाल्यानंतर देशातील बहुतेक सारे व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले होते.