डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांचे आश्वासन
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात होत आहे. त्यासाठी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन देखील आश्वासनांची खैरात करत असल्याचे दिसत आहे. सत्ता आली तर एच-1 बी व्हिसा प्रणालीत सुधारणा करून ग्रीनकार्ड कोटा पद्धती रद्द करण्यात येईल, असेही बिडेन यांनी जाहीर केले आहे.
एच-1 बी व्हिसा हा अस्थलांतरित पद्धतीचा असून त्याच्या मदतीने अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना नोकरी देतात. येथील संगणक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतेक सर्व कंपन्या त्या व्हिसाद्वारे परदेशातील कर्मचारी वर्गाला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण देतात व मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देतात. जगभरातील अन्य देशांपेक्षा भारत व चीन या देशातूनच सर्वाधिक कुशल कर्मचारी त्यांना मिळतात.
भारतीय स्वातंत्र्यानिमित्त झालेल्या एका शुभेच्छा सोहळ्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बिडेन यांनी हे आश्वासन दिले. अमेरिकेतील भारतीयांसाठी निवेदन जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असून देशातील 8 राज्यात 13 लाख भारतीय मतदार आहेत. त्यामुळे त्यांना प्रलोभन देण्याच्या बिडेन यांच्या कृतीची चर्चा होत आहे.