जळगाव – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आहे. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले. सध्या गौतमीच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. एकीकडे गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे. तर दुसरीकडे तिच्यावर अनेकांकडून टीका देखील केली जाते. मात्र सध्या गौतमीच्या वडिलांची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तिच्या वडिलांनी लेकीवर होत असलेल्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
यापूर्वी गौतमीने ती आणि तिची आई वडिलांपासून विभक्त राहत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पहिल्यांदाच तिचे वडील माध्यमांच्या समोर आले आहे. गौतमीचे वडिल जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुक्यातील वेळोदे गावात राहतात. त्यांचे नाव रविंद्र बापू नेरपगारे पाटील असे आहे, त्यांचे वय 65 वर्ष आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतमीचे वडील म्हणाले की, “गौतमी मला लहान असताना पप्पा म्हणायची. मी गौतमीला गौतमी बेटा अशी हाक मारायचो. तिचं खरं नाव गौतमीच आहे. तिची आजी तिला वैष्णवी नावाने हाक मारायची.”
पुढे ते म्हणाले, “आज ती चांगला डान्स करते याचा आनंद होतो. पण लोक तिच्यावर टीका करतात याचं वाईटही वाटतं. माझ्या मुलीनं पाटील हे आडनाव का लावू नये? तिचं आडनाव पाटील आहे ते आडनाव ती लावणार. मी बाप म्हणून तिच्या पाठिशी आहे. ती एक कलाकार आहे. इतर कलाकारांप्रमाणे ती तिची कला सादर करते.” यावळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
कुटुंबापासून विभक्त होण्यामागचे कारणही गौतमीच्या वडीलांनी सांगितले. ते म्हणाले की, “साधारण 18-20 वर्षांपूर्वी मी पुण्यात नोकरीला होतो. पण वय झाल्याने मला कोणी नोकरीवर ठेऊन घेत नव्हते. तेव्हा मी बायकोला म्हणालो होतो की पुन्हा गावाला येऊ, पण तिने मुलीला घेऊन गावी येणार नाही असं सांगितलं. तेव्हापासून मी बायको आणि मुलीपासून दूर आहे. गौतमी आणि माझी बायको माझ्याबरोबर असल्याचं मला दु:ख वाटतं. गौतमी पुन्हा माझ्याबरोबर राहावी. तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी, असे मला वाटते,”
दरम्यान, गौतमीच्या वडिलांना दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे ते गौतमीच्या आईला सतत मारहाण करायचे याला कंटाळून गौतमीच्या आजोबांनी तिच्या आईला माहेरी आणले होते, असे गौतमीने एका मुलाखतीत सांगितले होते.