पुणे – गौतमी पाटीलच्या लावणीने अल्पावधीतच अनेकांना वेड लावले आहे. सध्या तिच्या लावणीची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. लोक लांबून लांबून गौतमीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशात गौतमीच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसे तर गौतमीचे सर्वच व्हिडीओ व्हायरल होतात परंतु यावेळी गौतमी थेट बैलासमोर नाचताना दिसत आहे.
एरवी गौतमीचा कार्यक्रम म्हंटल की गर्दी.. सुरक्षा व्यवस्था असा मोठा तामझाम समोर ठेवावा लागतो. परंतु पुण्यातील मुळशी तालुक्यात काहीस वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. गौतमी आली.. तिने पाहिलं आणि ती नाचली. परंतु यावेळी तिच्यासमोर कोणीही माणूस नव्हता विशेष म्हणजे असं असूनही गौतमी आणि तिच्या संपूर्ण टीमने त्याच जोशात आपली अदाकारी सादर केली. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावेळी गौतमी थेट बैलासमोर नाचताना दिसत आहे.
मुळशीमध्ये सुशील हगवणे युवा मंचातर्फे गौतमीच्या डान्स प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टेजही भव्य दिव्य प्रकारचा बनवण्यात आला होता. या स्टेजसमोर बावऱ्या नावाचा बैल बांधण्यात आला होता. गौतमीची ही अदाकारी जणू बावऱ्यासाठीच होती. गौतमीच्या या नृत्याची चर्चा आता राज्यभर सुरु झाली आहे.
https://youtu.be/AfHhfAtDY_8
कोण आहे बावऱ्या ?
बैलगाडा शर्यतींमध्ये प्रसिद्ध झालेला बावऱ्या हा बैल गाडा शौकिनांमध्ये खूप खास आहे. बैलगाडा शर्यतींमध्ये बावऱ्याकडे मानाचा बैल म्हणून पाहिले जाते. आजवर बावऱ्याने अनेक शर्यती जिकल्या आहेत. बावऱ्या आणि गौतमी पाटीलच्या नृत्याची सध्या गाडाशौकिनांमध्ये जोरदार चर्चा आहे.