नवी दिल्ली – गुजरातमधील उद्योग पती गौतम अदानी हे आता जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. अगदी काहीच दिवसांपुर्वी त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. आणि आता त्यांनी ऍमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बोजेस यांना मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. फोर्बसने जाहीर केलेल्या यादीनुसार अदानी यांची एकूण संपत्ती आता, 154.7 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एलन मस्क हे उद्योगपती आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 273 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
मोदी सरकार केवळ अदानी आणि अंबानी यांच्यासाठीच काम करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यातही अदानी उद्योग समुहावर मोदी सरकारकडून सातत्याने मेहरनजर केली जात असल्याचाहीं दावा विरोधकांकडून विविध दाखले देऊन केला गेला आहे. सरकारी कंपन्या अदानींना कवडीमोल भावाने विकल्या जात असून सरकारी बॅंकांकडून त्यांना अब्जावधी रूपयांच्या कर्जाची खैरात केली जात असल्याचाही आरोप अनेक विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला गेला आहे.
गेल्याच महिन्यात अदानी यांनी बरनार्ड आरनॉल्ट यांना मागे टाकून श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले होते. अंबानी यांची संपत्ती 92 अब्ज डॉलर्स इतकी असून ते श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. अदानी उद्योग समुहाच्या नावावर एकूण सात लिस्टेड कंपन्या आहेत. खाण, उर्जा आदि क्षेत्रात त्यांचा कारभार चालतो.