तळेगाव ढमढेरे – येथील एचपी वितरक ग्राहकांकडून वीस रुपये जास्त दराने विक्री करत असल्याची घटना या परिसरात घडत आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे एचपी एजन्सीचे उपवितरण कार्यालय असून या ठिकाणी ग्राहकांना प्रत्येकी टाकी मागे 20 रुपये जादा दराने पैसे द्यावे लागत आठवड्यातून दोन वेळा गुरुवारी आणि रविवारी गॅस भरून गाडी येते. एका वेळेस 70 टाक्या आणल्या जातात, एका महिन्यात 5600 रुपये जास्त लाटले जातात. नक्की हे पैसे घेतो कोण? हा संशोधनाचा गंभीर विषय बनला आहे, असे गेली अनेक दिवस चालत आहे, यावर दक्षता समितीचे दुर्लक्ष आहे.
ग्राहकांचा होणारा आर्थिक तोटा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सणससुदीत नागरिकांना काळ्या बाजारात चढ्या भावाने गॅस सिलिंडर टाकी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच येथील वितरक ग्राहकाकडून 20 रुपयांपासून तर 50 रुपयांपर्यंत जादा रक्कम घेत असलेले निदर्शनास आले आहे. यावर संबंधित पुरवठा विभागाने आजपर्यंत कारवाई का केली नाही? याचे नवलच वाटत आहे.
या ठिकाणी भरलेल्या सिलिंडरचे वजन करण्यासाठी वजन काटा उपलब्ध नाही, वारंवार जुन्या व खराब सिलिंडर टाक्या बदली करण्यासाठी ग्राहकांची होणारी हेळसांड, त्यातून होणारा वाद हा नित्याचा ठरलेला आहे. सिलिंडर उतरवताना कर्मचारी गाडीतून सिलिंडर फेकत असतो. यामुळे पुढील होणारा अपघात याला जबाबदार कोण? असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पावती मिळण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरले जात आहे; परंतु पावती मिळत नाही. यामुळे मुळ सिलिंडरची किंमत कळत नाही आणि यामुळेच ग्राहकांकडून जादा दराने उकळणी केली जाते. तीन वर्षांपूर्वी पुरवठा विभागाने काळ्या बाजारात गॅस सिलिंडर विक्री करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई केली होती; परंतु आता सुळसुळाट वाढला असूनही कारवाई का होत नाही?
मी या प्रकाराची माहिती घेईन. तथ्य आढळल्यास याची गंभीर दखल घेऊन चौकशी केली जाईल.
-अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली
या प्रकाराबाबत सोमवारी संबंधित वितरकास कळविण्यात येईल. यानंतर पुढे काय कारवाई करायची ते ठरवू.
-वंदना नवले, पुरवठा अधिकारी शिरूर