बॉलीवूडमध्ये गणेशोत्सव की गणेशोत्सवात बॉलीवूड

बॉलीवूडमध्ये प्रत्येक सण दाखवला जातो. दहीहंडी, रक्षाबंधन, दिवाळी या सगळ्या सणांच्या बरोबर गणेशोत्सवाचे सीन हमखास असतातच. या गणेशोत्सवातील काही सीनमुळे काही सिनेमे जबरदस्त हिट झाले होते. याच गणेशोत्सवावर आधारलेली गाणीही जबरदस्त हिट झाली आहेत.

अशा काही निवडक सिनेमांमध्ये रेमो डिसुजाचा “एबीसीडी’ हादेखील आहे. गणरायासमोर एक ग्रुप डान्स यामध्ये दाखवला गेला आहे. प्रभुदेवाच्या कोरीग्राफीखाली तयार झालेल्या या गाण्याची क्रेझ जबरदस्त होती. हृतिक रोशनच्या “अग्निपथ’मध्येही याच गणेशोत्सवावरील एक गाणे आहे. याच गाण्यांमध्ये हृतिक रोशन व्हिलनला स्वतःचे नाव विजय दीनानाथ चौहान असल्याचे सांगतो आणि त्या व्हिलनला मारतो हा सीन प्रेक्षकांच्या लक्षात असेल.

दुसरीकडे महेश मांजरेकरच्या “वास्तव’ मध्ये एक संपूर्ण कुटुंब पूजा करते आणि वाईटपणा संपवायची प्रार्थना करते. तर दुसरीकडे पोलीस एका निर्दोष व्यक्तीला छळतात. याच छळामुळे हा निर्दोष व्यक्‍ती वाममार्गाला लागतो. असे विसंगत दृश्‍य बघायला मिळते. शाहरुख खानच्या “डॉन’ मध्येही गणेशोत्सवावरील एक डान्स आहे. गणेशोत्सवातील उत्साहाची धूम यातून दिसते. सर्वात शेवटी “सत्या’मध्ये भिकू म्हात्रेला मारणाऱ्या नेत्याला सत्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतच संपवतो, असं दिसले होते.

बहुतेक वेळा गणेशोत्सव हे मांगल्याचे, आनंदाचे, उत्साहाचे आणि संस्कृतीचे प्रतीक न दिसता गोंधळ, गोंगाट आणि गर्दीच्या अडून खून आणि गॅंगवॉर घडवण्याची संधी म्हणूनच बॉलीवूडमध्ये गणेशोत्सव रंगला गेला आहे. आता तर मराठीतही गणेशोत्सवाचा सीन दिसणे दुर्मिळ झाले आहे. गणेशोत्सवात गाजणाऱ्या भक्‍तिगीतांची संख्याही रोडावत चालली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये गणेशोत्सव की गणेशोत्सवात बॉलीवूड असा प्रश्‍न पडतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×