पुणे – पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती यंदाच्या गणेशोत्सवात जगभरातील तब्बल 70 हजार 607 गणेशभक्तांनी स्वत:च्या घरातून केली. उत्सवाच्या सहाव्या दिवसापर्यंत सुमारे 60 देशांतील भाविकांनी ऑगमेंटेंड रिऍलिटी तंत्रज्ञानाचा वापर करत आरती केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षीच्या गणेशोत्सवात ऑगमेंटेंड रिऍलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
केंद्र व राज्य शासनाने केलेल्या ऑनलाइन दर्शन घेण्याचे आवाहन केल्याने हे तंत्रज्ञान उपलब्ध केल्याचे डिजिटल आर्ट व्हीआरईचे संचालक अजय पारगे यांनी सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, “ट्रस्टतर्फे दिलेल्या या तंत्रज्ञानामुळे घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होत आहे.
आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करत असल्याचा आनंद भक्तांना घेता येत आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, यूएई, सिंगापूर, जर्मनी, कतार, न्यूझीलॅंड, अशा सुमारे 60 देशांतील भक्तांनी या तंत्राचा वापर केला आहे.