मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सहकुटुंब मुंबईतील ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते. गृहमंत्री अमित शाहांच्या लालबाग दर्शनावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमित शाह दरवर्षी गणोशोत्सवात लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात त्याप्रमाणे यंदा देखील ते राजाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.
लालगाबचा राजाचे दर्शन घेताना अमित शाहांसोबत त्याची पत्नी, सून आणि नातवंडही असल्याचे पाहायला मिळाले. शाहांनी लालबागचा राजासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. त्यानंतर पुष्पहारही अर्पण केला. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हेही उपस्थित होते.
लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रा येथील गणपतीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर शाह मलबार हिलला गेले. तेथे देवेंद्र फडणवीसांच्या ‘सागर’ या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. याच ठिकाणी मुंबई कोअर कमिटीची एक बैठकही झाली.
फडणवीसांच्या सागर निवासस्थानानंतर ते वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी जातील. या ठिकाणी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४५ मिनिटे बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे अनेकांचं लक्ष आहे. या बैठकीनंतर अमित शाह पवईला जातील. तेथे ए. एम. नाईक संस्थेच्या शाळेचे उद्घाटन करतील.