चर्चेत: शौर्य व सौहार्द शिकवणारा “दसरा’

विलास पंढरी

प्रत्येक सण काहीतरी चांगला संदेश देत असतो. दसरा तर साडेतीन मुहुर्तांपैकी एक. अनेक चांगल्या गोष्टी दसरा आपल्याला शिकवतो. विजयादशमी किंवा दसरा सण दुष्टावर सूष्टाचा विजय या संकल्पनेतून भारतभर उत्साहात साजरा होतो.

दसरा म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ती आपट्यांची पानं … अत्यंत महत्त्वाचा असा कुठलाही उपक्रम सुरू करायलाही दसरा हा उत्तम मुहूर्त मानला जातो. वाहन, गृह किंवा कुठल्याही खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला जातो. पण हा सण भारतात साजरा करण्याच्या पद्धती मात्र वेगवगळ्या आहेत. आपल्याकडे जसं घटस्थापनेला घटात धान्य पेरलं जातं, तसंच काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातीच्या भांड्यात सत्तू पेरतात. दसऱ्याच्या दिवशी त्यातून उगवलेले कोंब ज्याला नोरात्रा किंवा नोरता म्हणतात, ते पुरुषमंडळी त्यांच्या टोपीत खोचतात किंवा कानामागे ठेवतात. कारण हे नोरता शुभलक्षणी मानले जातात.

जशी देवीची साडेतीन पीठं आहेत तसे मुहूर्तही साडेतीन मानण्याची परंपरा आहे. दसरा हा त्यातील एक मोठा मुहूर्त समजला जातो.साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करायलाही शिकवतो. म्हैसूरचाच दसराही म्हैसूर पॅलेसवर केल्या जाणाऱ्या खास झगमगाटासाठी व हत्तींच्या मिरवणुकीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पूर्वी राजे, विशेषतः छत्रपती व पेशवे युद्धावर जाण्यासाठी विजयादशमीला कूच करीत असत.

महाराष्ट्रात विशेषतः खेडेगावात दसरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पुरुष मंडळी व लहानमोठे तरुण वेशीबाहेर म्हणजे गावाबाहेर जमतात. जातानाच सोनं म्हणजे आपट्याची पाने बरोबर घेतात. तिथे वाजतगाजत रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात येते. नंतर गावात येऊन प्रथम ग्रामदेवताला आपट्याची पाने देऊन नमस्कार केला जातो. बहुतेक सगळे एकमेकांच्या ओळखीचेच असतात. एकमेकांना आपट्याची पाने देऊन आलिंगन दिले जाते. घरोघरी तबकात निरांजन घेऊन महिला, विशेषतः कुमारिका बसलेल्या असतात. सीमोल्लंघन करून आल्यावर पुरुष मंडळींना त्या ओवाळतात व पुरुष त्यांच्या तबकात आपट्याची पाने टाकतात. ओवाळणारी भगिनी त्या बदल्यात विड्याचे पान देते. लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त पाने जमा करण्याची स्पर्धा लागते. यानिमित्ताने सर्वांचे एकमेकांच्या घरी जाणे होते. अबोला, वाद असतील तर ते विसरले जाते. आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना देऊन नमस्कार करण्याची प्रथा आहे.

1. स्वतः समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्‍तीची देवता आहे. यासाठी अश्‍विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करून नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन्‌ शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर आनंदाप्रित्यर्थ सर्वांना सोने वाटावयाचे असते.

2. या दिवशी रामाचा पूर्वज रघू या अयोध्याधिशाने विश्‍वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या म्हणून रघुराजा कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. युद्ध नको म्हणून आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेराने सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. कौत्स केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना वाटण्यात येतात. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी सण साजरा करतात. राजकारण हे प्रजेच्या हितासाठी असून
स्वतःचे खिसे भरण्यासाठी नसतं असा संदेश राजकारण्यांना देणारा हा दिवस आहे.

3) श्रीराम आणि हनुमान तत्त्वे अन्‌ क्षात्रवृत्ती एकाच वेळी जागृत करणारा दसरा हा सण आहे. या दिवशी ब्रह्मांडात श्रीराम तत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. या क्षात्रभावातून आपल्याला ईश्‍वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. दसऱ्याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक, म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास साहाय्य होते अशी समजूत आहे. जिवाने आपल्यामध्ये क्षात्रगुणाचे संवर्धन केल्यानेच तो सहज दुर्जनरूपी शक्‍तींचा संहार करू शकतो. म्हणूनच या दिवशी युद्धासाठी बाहेर पडत असत, सीमोल्लंघन करीत असत व विजयी होत असत.

दसरा हा सण संपूर्ण भारतासह अन्य देशांमध्येही मोठ्या हर्षोउल्हासात साजरा होतो. भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, चीन आणि थायलंडमधेही दसरा साजरा केला जातो. नेपाळमध्ये तर विजयादशमी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण आहे. नेपाळमधील गुरखे काली माता आणि दुर्गा मातेची नऊ दिवस पूजा करतात. विजयादशमीच्या दिवशी राजदरबारात राजा आपल्या प्रजेला अबीर, तांदूळ आणि दह्याचा टिळा लावतो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मॉरिशसमध्ये हिंदू हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here