नवी दिल्ली – भारताची “गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम 2024 च्या चौथ्या तिमाहीदरम्यान करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), अणुउर्जा आणि अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेला असलेले सर्वोच्च महत्त्व विचारात घेऊन उड्डाणाच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये क्रू एस्केप प्रणाली आणि पॅराशूट आधारित वेग कमी करण्याची प्रणाली यांच्या कामगिरीची चाचपणी करण्यासाठी मुख्य “जी1′ मोहिमेपूर्वी दोन चाचणी वाहन मोहिमा राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क; केंद्राकडून घेण्यात आला आढावा
मानवरहित “जी1′ मोहीमेचे प्रक्षेपण 2023च्या शेवटच्या तिमाहीमध्ये करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापाठोपाठ “जी2′ या मानवरहित दुसऱ्या मोहिमेअंतर्गत 2024च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रक्षेपण करण्यात येईल आणि त्यानंतर “एच1′ ही मुख्य मानवी अंतराळ मोहीम 2024च्या चौथ्या तिमाहीमध्ये राबवणार असल्याची माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
पहिला मानवरहित गगनयान कार्यक्रम म्हणजे “जी1′ मोहीमेचे मानव वापर करणार असलेल्या प्रक्षेपक वाहनाची, कक्षीय प्रवेशाच्या प्रणालीची, मोहीम व्यवस्थापन, दळणवळण प्रणाली आणि पूर्वस्थितीत येणाऱ्या क्रियांची कामगिरी पडताळून पाहणे हे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. या अंतराळयानामध्ये वाहक भार म्हणून एक मानवी प्रतिकृती पाठवण्यात येईल.
अंतराळवीरांचे प्रशिक्षण बेंगळूरुमध्ये सुरू
या मानवी अंतराळ मोहिमेत सहभागी होण्यासाठी अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून सध्या ते बंगळूरु येथे या मोहिमेचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. अंतराळवीर प्रशिक्षणाचे पहिले सत्र पूर्ण झाले असून त्यामध्ये त्यांना सैद्धांतिक विषय आधारित, अंतराळ वैद्यकशास्त्र, प्रक्षेपक वाहने, अंतराळयान प्रणाली आणि जमिनीवरील पाठबळ पुरवणाऱ्या पायाभूत सुविधा, नियमित शारीरिक तंदुरुस्ती सत्रे, एरोमेडिकल प्रशिक्षण आणि उड्डाणाचा सराव अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्वांशी संबंधित मूल्यमापन आणि कामगिरी तपासून पाहणारे उपक्रम देखील पूर्ण करण्यात आले आहेत. अंतराळवीर प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सध्या प्रगतीपथावर आहे.