वॉशिंग्टन – करोना रोगाच्या प्रसारामुळे अत्यंत महत्वाची असलेली जी 7 देशांची परिषद आता प्रत्यक्ष उपस्थिती ऐवजी व्हिडीओ कॉन्फन्सींगवरच घेतली जाणार आहे. ही परिषद येत्या जून महिन्यात अमेरिकेत व्हायची होती. पण ती व्हिडीओ कॉन्फरन्सवरच होईल अशी माहिती व्हाईट हाऊसच्यावतीने आज देण्यात आली.
करोना विषाणुंमुळे जगभरात नऊ हजार लोक दगावले असून लक्षावधी लोकांना याची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनामुळे जगभरातील परिषदा, स्पर्धा आणि बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तथापी जी 7 देशांची ही महत्वाची परिषद रद्द करण्याऐवजी त्यावर हा उपाय योजण्यात आला आहे.
जी 7 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आपआपल्या देशातील करोना उपाययोजनांकडे अधिक लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेत अमेरिका, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटाली, जपान आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे. यातील इटाली,अमेरिका आणि फ्रांस हे देश करोनाने अत्यंतिक बाधित आहेत.