पुणे – शहरात एकाच वेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबतच “जी-20′ परिषद होणार आहे. पालखी सोहळा आणि परिषद शहरात एकाच वेळी 12 ते 14 जूनला असल्याने परिषदेत सहभागी होणाऱ्या परदेशी पाहुण्यांनाही वारीचे दर्शन घडविले जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात विशेष सुविधा करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांनी दिली.
दरम्यान, पालखी मार्गावर पालिकेकडून मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण करण्यात येणार असून संगमवाडी, फर्गसन महाविद्यालय गेट आणि हडपसर रस्ता अशा तीन ठिकाणी विठ्ठल शिल्प साकारले जाणार आहे.अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले की, “जी-20′ परिषद 12 जूनपासून सुरू होत आहे. याच दिवशी शहरात पालखी सोहळे दाखल होणार आहेत. परिषद आणि वारीच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांवरील सर्वच उड्डाणपूल, नदीवरील पुलांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
विमानतळाजवळ असलेल्या इमारतीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून शनिवारवाड्याची प्रतिकृती साकारून उपस्थितांचे स्वागत केले जाईल. रस्ता दुभाजकांवर प्रकाशमान झाडे, फुलांचे ताटवे उभे केले जाणार आहेत.