मायणी -कानकात्रे (ता. खटाव) येथील मायणी- म्हसवड रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ भरधाव वेगाने येणारी चारचाकी पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार दिलीप भोसले यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर येथील हर्षराव मारुती सुर्यवंशी (वय 59) हे आपल्या पिकअप (एमएच 10 डीटी 7479) मधून अकलूज या ठिकाणी केळी आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी मायणी मार्गे इस्लामपूरला जात असताना कानकात्रे (ता. खटाव) येथे आले असता, त्यावेळी मोठा पाऊस पडत होता. त्यांचे वाहन म्हसोबा मंदिराजवळ येताच समोरुन आलेल्या दुचाकीची (क्रमांक एमएच 10 बी 4681) धडक झाली. यामध्ये देवापूर (ता. माण) येथील दुचाकीस्वार दिलीप शंकर भोसले (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. ते मायणीकडून म्हसवडकडे निघाले होते. तर हर्षराव मारुती सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.