नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.
जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव काल मिलिट्री विमानानं दिल्लीला आणले गेले. आज जनरल रावत यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे.
दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तामिळनाडूतून गुरुवारी13 जणांचे पार्थिव दिल्लीतल्या पालमपूरमध्ये आणण्यात आले. यावेळी निधन झालेल्या 13 जणांचे कुटुंब उपस्थित होते. कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली अर्पण केली. शिवाय तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली.