पुणे- पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेकडून उद्या (शनिवारी) पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्या अंतर्गत शनिवारी सकाळी 10:00 ते दुपारी 04:00 या वेळेत नगरकर तालीम ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंत लक्ष्मी रस्त्यावर “लक्ष्मी रस्ता ओपन स्ट्रीट मॉल’ हा उपक्रम राबविला जाणार असून या कालावधीत या परिसरात खासगी वाहनांना बंदी असणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पादचारी दिना निमित्ताने हा उपक्रम असणार आहे. सकाळी 10:00 ते दुपारी 04 यावेळेत ग्राहकांसाठी या भागात विविध मनोरंजक कार्यक्रमही असणार आहेत. वाहनांची भिती न ठेवता खरेदी करता यावी, यासाठी रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार असणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कालावधीत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी “पादचारी दिना’चे महत्व लक्षात घेत खासगी वाहनांऐवजी पीएमपीचा वापर करावा.
वाहन आणल्यास ते लक्ष्मी रस्त्यापासून योग्य अंतरावर पार्किंग करावे, वाहतुकीसाठी अडथळा ठरणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“पीएमपी’च्या वाहतुकीत बदल…
पीएमपीच्या “पुण्यदशम’ तसेच मंडई येथून गोखलेनगरकडे जाणाऱ्या बसेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पुण्यदशम अटलच्या पुणे स्टेशनकडून येणाऱ्या बसेस सिटी पोस्ट चौकापर्यंत नियमित येऊन पुढे नूमवि हायस्कूल चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने शनिवारवाडा, महापालिका पुलावरून जंगली महाराज रस्त्याने डेक्कनला जातील तर गोखलेनगरकडे जाणाऱ्या बसही याच मार्गाने जातील. डेक्कनहून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसच्या मार्गामध्ये कोणताही बदल असणार नाही.