मुंबई, दि. 6 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना 141 कोटी 64 लाख 21 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी 31 मार्चपूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबी विचारात घेऊन राज्य कार्यकारी समितीने 27 एप्रिल रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना रु. 141,64,21,000/- (रुपये एकशे एकेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकवीस हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये विभागीय आयुक्त कोकणसाठी 7319.97 लाख रुपये, विभागीय आयुक्त पुणेसाठी 5573.85 लाख रुपये, विभागीय आयुक्त नाशिकसाठी 245. 20 लाख रुपये आणि विभागीय आयुक्त औरंगाबादसाठी 1025 .19 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.