नगर – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नगर येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (दि. ८) मे रोजी ही घटना घडली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. ती जी माती आहे, ती औरंगाजेबाची माती आहे. त्या मातीतले हे दोन व्यापारी आहेत. औरंगाजेबचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झाला आहे, इतिहास पहा तुम्ही. दावत नावाच गाव आहे, अहमदाबादच्या बाजूला, औरंगाजेब तेथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत. एका औरंगाजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलाय, २७ वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगाजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खाणलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तू कौन है, असे व्यक्तव्य राऊत यांनी प्रचार सभेत केले होते.
देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून प्रक्षोभक भाषण केले. पंतप्रधान यांना गाडण्याची धमकी दिली. तसेच दोन धर्मामध्ये द्वेषाची व वैरत्वाची भावना निर्माण करण्याचा भाषणादरम्यान प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी राऊत यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.