नवी दिल्ली – युरोपमध्ये करोनाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. त्यामुळे तज्ञांचे म्हणणे आहे की, आगामी काळात इंधनाच्या किमती कमी होऊ शकतात. मागणीच्या चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती घसरल्याने देशांतर्गत इंधन विक्रेते पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास प्रवृत्त करू शकतात. एका रिपोर्टनुसार सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.
ब्रेंट क्रूडच्या किंमतीत मोठी घसरण
बेंचमार्क ब्रेंट क्रूड शुक्रवारी एक महिन्याची उच्चांकी गाठल्यानंतर 6.95 टक्क्यांनी घसरून $80 च्या खाली म्हणजेच $78.89 प्रति बॅरलवर आले आहे. ब्रेंट क्रूडची ही किंमत 1 ऑक्टोबरपासून सर्वात कमी आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी, त्याची किंमत प्रति बॅरल $ 84.78 वर पोहोचली होती.
भारतातील उत्पादन शुल्क कपातीचा परिणाम
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती जे थेट आंतरराष्ट्रीय बेंचमार्कच्या दैनंदिन चढउतारांशी जोडलेले आहेत, ते गेल्या 4 नोव्हेंबर पासून स्थिर आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांनी कपात केली होती.