शिंदे वासुली – वराळे ते महाळुंगे इंगळे एमआयडीसी दोन टप्प्यांना जोडणारा 4 किमी अंतराचा रस्ता पीएमआरडीएकडून मंजूर झाला आहे. त्यासाठी 7 कोटी 47 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग 50 ते बिरदवडी ते आंबेठाण ते महाळुंगे इंगळे, आंबेठाण ते महाळुंगे इंगळे व वराळे ते महाळुंगे इंगळे या 3 महत्त्वाच्या रस्त्यांचे सर्वेक्षण पीएमआरडी च्या माध्यमातून झाले होते. यापैकी पुणे नाशिक रोड ते बिरदवडी महाळुंगे इंगळे रस्ता 12 कोटी 40 लाख रुपये खर्च करून पीएमआरडीएकडून सुरू असून या मार्चअखेर या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे.महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील 1 किमी रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले आहे.
उर्वरित 4 किमी रस्त्याचे 5.50 मीटर रुंदीचे डांबरीकरण केले जाणार आहे. दोन्ही बाजूने 1.5 मीटर रुंदी ने साईडपट्टी केली जाणार आहे. या कामांमध्ये रस्ता रुंदीकरण माती व मुरुमाचा भराव, 159 मीमीचे जीएसबी, 200 मीमीचे डब्ल्यू एमएम, 75 मीमीचे एमपीएम, 40 मीमीचे बिटूमिनस कॉंक्रीट करणे, 5 ठिकाणी एम20 मध्ये मोऱ्या बांधकाम करणे,तसेच या संपूर्ण कामाची तीन वर्ष देखभाल दुरुस्ती करणे या सगळ्यांचा या कामात समावेश आहे, अशी माहिती शरद बुट्टे पाटील व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप वाळके यांनी दिली.