– सुधा डोके
सध्या सगळीकडे व्यायाम करा, योगा करा अन् फिट राहा हा मंत्र जपला जातो. सकाळी मोकळ्या हवेत व्यायाम चांगला होतो म्हणतात. सर्वजण आपापल्या परीने व्यायाम करून फीट रहाण्याचा प्रयत्न करताहेत.
व्यायाम करणे म्हणजे नुसते हातपाय हलवून शरीराची हालचाल करणे नव्हे. त्यासाठी मनाची तयारी लागते. किंबहुना, त्याची परवानगी लागते. नाराज, दुःखी, आजारी, बेचैन मन असेल तर त्याच्याकडून काहीही केले जात नाही. त्यालासुद्धा कंटाळा, थकवा येतोच की, अशा अवस्थेत व्यायाम, योगा करायचे ठरविले तर ते लाभदायक न ठरता हानिकारक ठरेल.
मन म्हणजे नेमके कास? मनाचा अवयव कोणता? मनामध्ये असते म्हणजे नेमके कुठे असते? ही सर्व मनाची उत्तरे अनुत्तरित आहेत. मन आहे, त्याला त्याचे अस्तित्व आहे आणि त्याच्या हुकुमानेच आपले दैनंदिन व्यवहार चालत असतात. मनाच्या शक्तीचा आवाका इतका, प्रचंड आणि अवाढव्य आहे की त्याला मोजमाप नाही.
ते कधी तुमच्याजवळ असते, तर कधी सातासमुद्रापलीकडे सुद्धा असते. तर कधी आकाशात उंच भरारी घेत असते. आपले मन आपल्याच शरीराच्या लॉकरमध्ये बंदिस्त असते. सर्व व्यापातून मनाला आनंदी ठेवणे हेच आपले काम आहे. जेव्हा तुमचे मन आनंदी उत्साही असेल तेव्हाच तुम्ही चांगली कामे यशस्वीरित्या पार पाडू शकता.
अशा मनाच्या प्रफुल्ल अवस्थेत तुमचा व्यायाम, योगा, ध्यानधारणा चांगली होईल आणि ती तुमच्या शरीराला फायदेशीर होईल. शरीरसुद्धा त्या व्यायामाचा स्वीकार आनंदाने करेल. म्हणून व्यायाम करताना मनाची बैठक चांगली प्रसन्न असेल तेव्हाच तो करावा. त्याला मारून मुटकून व्यायाम करावयास लावणे चुकीचे आहे.
एकदा का मनाने आपणहून व्यायामाचे व्रत स्वीकारले तर तो व्यायाम करण्याचा ग्रीन सिग्नल समजा. आनंदी मनच हे व्यायामाबाबत सकारात्मक असते. मग तो व्यायाम मोकळ्या मैदानात असो, डोंगरावर असो, स्वच्छंदी आनंदी मनाने केलेला व्यायाम भरपूर मानसिक समाधान आणि ऊर्जा देऊन जातो. आनंदी मन निरोगी जीवनाची गुरूकिल्लीच आहे.