राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मीनाक्षी लेखींची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली – राफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने राफेल पुनरावलोकनवर निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून नरेंद्र मोदींवर, कोर्टानेही सांगितले चौकीदार चोर है, असे म्हणत टीका केली होती. त्यामुळे राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी, कोर्टाने जे म्हटलेले नाही तेच कोर्टाच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करून, न्यायालयाचा अवमान केला असल्याची तक्रार करत भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राफेल निकालावर बोलताना राहुल गांधी यांनी, आता न्यायालयानेही चौकीदारही चोर है, वर शिक्कामोर्तब केले आहे असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर, राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे अशी प्रतिक्रीया भाजपकडून देण्यात आली होती.

त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये राहुल गांधींनी आपली वैयक्तिक टीका मिसळून केलेले वक्तव्य, हे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारे असून, त्यांनी पक्षपात निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे, मीनाक्षी लेखी यांनी या याचिकेत म्हंटले आहे.

मीनाक्षी लेखी यांच्या या याचिकेवर १५ एप्रिल रोजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.