घरखरेदी केल्यानंतर…

घरखरेदी केल्यानंतर एक मोठे काम पूर्ण झाल्यासारखे वाटते. स्वतःचे हक्‍काचे छप्पर डोक्‍यावर असल्यामुळे हायसे वाटते. परंतु काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करण्याची हीच वेळ असते. या तांत्रिक स्वरूपाच्या बाबी एकदा राहिल्या की राहून जातात आणि नंतर एखाद्या वेळी त्याचा त्रास होऊ शकतो. 

स्वतःचे घर खरेदी करण्यात आनंद असतोच. परंतु त्याचबरोबर घरखरेदी केल्यानंतर काही बाबींची दक्षता घेणेही आवश्‍यक असते. घर खरेदी केल्यानंतर लगेच त्या घराचा विमा तत्काळ प्रभावाने उतरविणे गरजेचे आहे. एकाच वेळी दहा वर्षांसाठी घराची विमा पॉलिसी घेता येते. त्याचबरोबर जोपर्यंत गृहकर्जाचे हप्ते सुरू राहणार आहेत, तेवढ्या कालावधीचा स्वतःचा जीवन विमाही घेणे हितकारक ठरते.

घरखरेदी केल्यानंतर घराशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या 2 ते 3 प्रती तयार करून घ्याव्यात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात. वाटल्यास हे दस्तावेज बॅंकेच्या लॉकरमध्ये किंवा इलेक्‍ट्रॉनिक सेफमध्येही ठेवता येतात. दस्तावेज खराब होण्याची धास्ती वाटत असल्यास सर्व कागदपत्र स्कॅन करून डीव्हीडीच्या माध्यमातून जतन करून ठेवणे शक्‍य असते. घरासाठी कर्ज घेतले असेल आणि त्यासाठी कागदपत्र बॅंकेकडे द्यायची असतील, तर मूळ दस्तावेजाच्या प्रती आधीच काढून आपल्याजवळ ठेवाव्यात. कारण नंतर बॅंकेकडून प्रती मिळविणे अवघड असते. तसेच बॅंकेला दस्तावेज देण्यापूर्वी कागदपत्रांची एक यादी तयार केली पाहिजे. म्हणजे कोणते दस्तावेज बॅंकेकडे दिले आहेत, हे आपल्याकडे लेखी स्वरूपात राहील. या यादीवर बॅंकेकडून पोहोचपावती घ्यावी. घर खरेदी केल्यानंतर विजेचे आणि पाण्याचे बिल लगेच आपल्या नावावर येण्यास सुरुवात होते. परंतु त्यासाठी दोन्ही कनेक्‍शन आपल्या नावावर ट्रान्सफर करून घ्यावी लागतात.

त्याचबरोबर मालमत्ता कर, ई. सी. आणि खात्यावरील नाव बदलून आपले नाव लागले आहे का, याची खात्री करून घ्यावी. जर सोसायटीत फ्लॅट घेतला असेल, तर सोसायटीची भाग प्रमाणपत्रे आपल्या नावावर करून घ्यावीत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला सेल डीडची प्रत सादर करावी लागते. घर खरेदीबरोबरच जर आपण मृत्युपत्र तयार करवून घेतले, तर अधिक चांगले. भविष्यात होणाऱ्या विवादांपासून आपली मुक्‍तता करून घ्यायची असेल, तर हे गरजेचे आहे. कुटुंबात या घरावरून वाद होऊ नयेत, असे वाटत असल्यास प्रथम मृत्युपत्र करवून घ्यावे. घर खरेदी केल्यानंतर आपला पत्ता बदलतो. आपल्याकडे असलेल्या प्रमुख दस्तावेजांवरील आपला पत्ता बदलून घेण्याची दक्षता घ्यायला हवी. कागदपत्रांवर जुनाच पत्ता राहिल्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रकारच्या वादापासून दूर राहायचे असल्यास महत्त्वाच्या आणि गरजेच्या दस्तावेजांवरील पत्ता बदलून घ्यावा.

– जगदीश काळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.